Search This Blog

Saturday 18 November 2023

|| तुका म्हणे - अंतिम भाग ३ - चक्षुर्वैसत्यम् ||

 

|| चक्षुर्वैसत्यम् ||

 

संत तुकाराम हे माझे अत्यंत आवडते संत कवि...

संत म्हणूनही...आणि असामान्य रचनाकार म्हणूनही... ...

पण तुकोबांवर माझं मनापासून प्रेम असण्याचं तिसरं च एक व्यावहारिक कारण आहे... ...

तें म्हणजे आजतागायत त्यांच्या ओंव्यानीं मला सौ. इंदिराजींच्या तंडाख्यातनं अगणित वेळां सफाचट वांचवलेलं आहे...अगदी बालंबाल.....

सौ. इंदिराजी फंणफंणल्या, की ' तुका म्हणे...' अशी सुरुवात करून एक पदरची, प्रसंगाला साजेशी ओंवी त्यांना ऐकवायची...की झालं...

अश्यांपैकी हा तिसरा आणि शेंवटचा किस्सा... ...

, “ हा...हा चष्मा जरां बघा हो...ठीक वाटतोय काय तुम्हांला तें ...” , सौ. इंदिराजी त्यांच्या हातातला जंवळचं वाचायचा चष्मा माझ्या हातात देत म्हणाल्या ...

मी चष्मा हातांत घेऊन नीट निरखून बघितला... ...

दिसायला जरी तो आकर्षक दिसत होता, तरी त्यातली गोम माझ्या लगेंच ध्यानात आली...चष्मा चिनी बनावटीचा केवळ तकलादू प्लॅस्टिक चा बनवलेला दिसत होता...त्याच्या कानांवर ज्या बसतात, त्या काड्यांत कुठंही धातु च्या घंणसर काड्या-बिड्यां चा मागमूस दिसत नव्हता...!!

बरं...बनावटीचं प्लॅस्टिक तरी दर्जेदार असावं ?...त्याचाही कुठं मागमूस दिसत नव्हता ... ...अगदी लहान पोरांच्या रांद्याच्या खेंळण्यातलं प्लॅस्टिक असतं ना ... अगदी थेट तसलाच कांहीतरी तो मामला दिसत होता खंरा... ... ...स्वतः च घणसर असलेल्या सौ. इंदिराजी नां तो तद्दन तकलादू चष्मा केवळ त्याच्या ' वरलिया रंगा ' मुळंच मनांत भंरला असावा, हें मी ताडलं... ...

फक्त तें समोरच उभ्या असलेल्या दुकानदाराच्या देंखत च सौ. इंदिराजी नां स्वच्छपणें कसं काय सांगायचं ? या दुग्ध्यात मी पडलो... ...


, “ काय...छान आहे ना चष्मा ?... ...मला तर पसंत पडलाय...”, सौ. इंदिराजी

आतां गि-हाईक गळाला लागलेलं च आहे, हें हेरून दुकानदारानं मांजा गुंडाळायला सुरुवात केली, “ चष्मा तुम्हांला अगदी चंपखल बसतोय मॅडम...आणि दिसतोयही अगदी छान...”

मॅडम आतां खूष झाल्या, “ काय किंमत आहे याची ?”

मी आतां तोड उघडलं..., “ मला वाटतंय इंदिराजी, की ह्या चष्म्याऐवजी तुम्ही तो दुसरा चष्मा निवडावा... ...त्याची घडण चांगली मजबूत आहे...आणि घेंतल्यासारखा तो टिकेलही पांचसहा वर्षं तरी...”

पण आतांपावेतों सौ. इंदिराजीनी गळ पुरता गिळलेला होता... ...कांही नको...तो महागही आहे बराच...आणि शोंभतही नाही माझ्या चेंह-याला अजिबात... ...”

तरी मी चिकाटी सोंडली नाही..., “ हे बघा इंदिराजी...मला तरी हा चष्मा जरा तकलादू च वाटतोय...नुस्तं प्लॅस्टिक च दिसतंय सगळं... ...अगदी भिंगं सुध्दां...तेव्हां... ...”

सौ. इंदिराजी दुकानदाराला म्हणाल्या, “ चांगला टिकेल ना हो हा ?”

दुकानदाराला काय...गल्ला भंरण्याशी च मतलब असतो फंक्त , “ त्याचं काय अहे मॅडम...साहेब म्हणतायत ना, तसा हा चष्मा फक्त प्लॅस्टिकचा च बनवलाय हे बरोबर आहे...पण हे प्लॅस्टिक चष्म्याच्या दर्जाचं असतं...खेंळण्यातलं नव्हे मॅडम...आणि तुमच्यासारखीं चोखंदळ माणसं असल्या गोष्टीं काळजीपूर्वक च वापरतात... ...हो की नाही ?...अहो नीट वापरल्या ना, तर प्लॅस्टिक च्या वस्तूही चांगल्या टिकतातच की ... ...आणि याची किंमतही अगदी कुणालाही परवडेल अशीच आहे... ...”

सौ. इंदिराजी, “ काय आहेत किंमती एकूण ?”

दुकानदार, “ हे बघा...हा साहेबां ना पसंत असलेला चष्मा...साडे सातशे ला आहे... ...तश्याच प्रकारच्या या दुस-या मध्यम बजेट वाल्या चष्म्याची किंमत आहे सव्वा सहाशे... ...”

सौ. इंदिराजी नी आतां तो रांद्या चा चष्मा उचलला, “ आणि ह्याची काय किंमत पडेल ?”

, “ किंमतही तुम्हांला अगदी पसंत पडण्यासारखीच आहे मॅडम "...दुकानदार गळाला लोंबकळणारा मासा टोंपलीत टाकीत आपली बत्तिशी विचकंत म्हणाला, “ दोनशे चाळीस रुपये फक्त...”

मॅडम नी आतां त्यांची तलवार बाहेर कांढली, “ काय ?...' ह्या ' ची किंमत दोनशे चाळीस ?...दोनशे करां फार फार तर...माझी कांही हंरकत नाही...

शेंवटीं बरीच रस्सीखेंच होऊन ' दोनशे विसांवर ' सौदा तुटला... ...

पावती करून देतां देतां दुकानदारानं त्याचं अस्सल रूप दांखवलं , “ पण एक गोष्ट ध्यानांत ठेंवा मॅडम...हे चष्मे थेंट तैवान वरून आम्ही आणतो... ...त्यांच्या किंमती लोकांना परवडतात म्हणून... ...पण उत्पादक या वस्तूं ची कसली हंमी वगैरे देत नाहीत बरं कां...खराब झाल्या, तर दुरुस्तही होत नाहीत ह्या, किंवा बदलूनही देत नाहीत आम्हांला... ... आतां नीट काळजीपूर्वक जर वापरल्या, तर उत्तम टिकतातही...पण मोडल्या-तुटल्या, तर मात्र टांकूनच द्याव्या लागतात... ...काय ?”

सौ. इंदिराजी कांही बोलल्या नाहीत...इतकं त्या आकर्षक स्वस्त चष्म्यानं त्यांच्यावर गारूड केलेलं दिसत होतं... ... ...

पुढचा एक आंठवडाभंर सौ. इंदिराजी हंवेत तरंगत होत्या...त्यांच्या तमाम महिला मंडळांत तो देखणा चष्मा एकदम लोकप्रिय ठंरलेला होता... ...आणि त्याची किंमत कळल्यावर तर भंल्या भंल्या ' घांसाघीस बहाद्दरणीं ' सफाचट त्रिफळाचीत च झांलेल्या होत्या...!!!


संत तुकारामांच्या च भाषेत सांगायचं तर खरेदी बाबतीत आमच्या इंदिराजीं चा बाणा असा आहे की

 

                        तुका म्हणे स्वस्तात स्वस्त | चीज खंरीदावी मस्त

                        घांसाघिशीची शिकस्त | सांडूं नये ||

 

आतां एक गृहिणी म्हणून हें उपरोक्त सगळं कौतुकास्पद च असलं, तरी कांही बाबतीत तें अंगलट येऊं शकतं...

तसं च कांहीतरी त्या उपनेत्रांचं झालं... ...

सौ. इंदिराजी, “ अहो...हा नवीन चष्मा बघां बरं जरा लावून...तुम्हांला कानशिलांवर कांही दाब-बीब जाणवतोय काय तें... ...”

योगायोगानं आमच दोघांचं चष्म्यां चा नंबर - आणि माप ही-सगळं एकसारखं च आहे...सौ. इंदिराजीं च्या चेह-या चं माप माझ्या मापापेक्षा अगदी केंसभंर च मोठं असेल-नसेल, इतकाच काय तो फंरक.

मी तो चष्मा लावून बघितला तर मला कांही कानशिलांवर दाब वगैरे जाणवला नाही, तेव्हां मी सौ. इंदिराजी नां सांगितलं, की , " तुम्ही म्हणताय तसं कांही जाणवत नाहीय मला...कदाचित वापरून जरासा सैल होईल तो... ...”


पुढं अंदाजे एक पंधरवडा उलटला असेल जेमतेम...

एका शांत दुपारीं सौ. इंदिराजी त्यांच्या शयनकक्षात वर्तमानपत्र वांचत बसलेल्या होत्या... ...माझ्या कार्यकक्षात माझी कांहीतरी दुरुस्त्यांची गडबड चाललेली होती.

अचानक सौ. इंदिराजीं च्या खोलीतनं कसलातरी ' खळ्ळ् खट्याक् ' चा विचित्र आवाज आला, आणि पांठोंपाठ सौ. इंदिराजीं चा तोंफखाना धंडाडला, “ जळ्ळे मेले हे दुकानदार... ...अहो...जरा इकडं या असाल तसें च...”

तें ' खळ्ळ् खट्याक् ' ऐकून मी हातांतली हत्यारं खालीं ठेंवलेलीं होतीच...आतां फक्त धांवलो... “ काय झालं ?...कश्याला हांक मारलीत मला ?”

सौ. इंदिराजीं, “ हें...हें बघा ह्या नव्या को-या चष्म्याचं काय भदं झालंय तें... ...मेल्यानं फंसवलंन् आपल्याला...”

बघतो तर आठ-दहा दिवसांपूर्वीच घेंतलेल्या त्या नव्या को-या चष्म्याचें मधोंमध दोन तुकडे होऊन सौ. इंदिराजीं च्या मांडीवर च लोळत पडलेले होते... ...!!!

मी, “ अरे बाप रे...कसं काय झालं हें ?”

सौ. इंदिराजी नी हातांतलं वर्तमानपत्र सावकाश खाली ठेंवलं... “ आपोआपच झालं...”

मी आतां कपाळाला हात लावला, “ आपोआप च झालं...म्हणजे ?”

सौ. इंदिराजीं, “ अहो...मी परवां म्हणत नव्हते काय तुम्हांला, की चष्मा जरां घालून बघां की कानशिलांवर त्याच्या काड्यांचा कांंही दाब-बीब जाणवतोय काय तें...म्हणून ?”

मी, “ बरं...मग?”

सौ. इंदिराजीनी च आतां कपाळाला हात लावला, “ तुम्हांला कांही जाणवलं नाही, तरी मला चष्मा घातल्यावर कानशिलांवर काड्यांचा जरा ज्यास्त च दाब पडतोय असं जाणवत होतं....तर आत्तां पेपर वांचत बसलेली असतांना आपोआप च तो बरोबर मधोंमध असा तुटून खाली पडला...!!

हंलकट मेले हे दुकानदार...लेकाचा बत्तिशी विचंकून मारे सांगत होता, की नीट वापरला, तर चांगला टिकेल म्हणून... ...आतां हा च नेऊन हांणते त्याच्या टाळक्यावर...!!!”

अश्या समर प्रसंगीं ' तरी मी तुम्हांला सांगत होतो...’ चं कीर्तन सौ. इंदिराजीं ना ऐकवायला जायचं नसतं...अगदी खंरोंखंरीच त्यांना सगळं सांगितलेलं असलं तरीही...तसं करणं म्हणजे स्वतः च स्वतः ला तोंफेच्या तोंडीं देण्यातला प्रकार असतो, हें मला गेल्या चाळीस वर्षांच्या अनुभंवांतनं तोंडपाठ झालेलं होतं... ...!!

मी तुकोबांच्या आड दंडलो, “ तुका म्हणे...”

सौ. इंदिराजीं च्या भिवया वर गेल्या, “ काय... तुका म्हणे ?”

मी उपदेश ओंकून टांकला ...

 

                            , “ तुका म्हणे स्वस्तात स्वस्त | चीज खंरीदावी मस्त

                         तिस-या वारीं नादुरुस्त | पत्करावी !!! ||

 

, “ आतां हें घेऊन दुकानदाराकडं जाण्यात काय अर्थ आहे ?...त्यानं खरेदीची पावती करतांनाच आपल्याला सांगितलं होतं ना, की ' या चष्म्यांची कांही-कसली हंमी बिमी आम्ही देऊं शकत नाही ' म्हणून ?...मग आतां त्याच्याकडं हें नेऊन काय साधणाराय ?...कांही उपयोग नाही त्याचा...आपण च फंसलोय...फंसवले गेले नाही आहोत...समजतंय तुम्हांला ?”

सौ. इंदिराजी, “ फंसवलं नाही कसं ?...मेल्याला सांगतां येत नव्हतं की ' हा चष्मा घेऊं नकां दुसरा घ्या ' म्हणून ?”

मी, “ हें तो कश्याला सांगेल ?...तें मी सांगितलं होतं तुम्हांला... ...”

सौ. इंदिराजी, “ म्हणजे फंसवलच ना त्यानं ?... ...मग काय करायचं आतां ?....जरा तुमचा चष्मा द्या मला पेपर वाचायला...”

मी, “ छा ऽ ऽ ऽ ऽ न...आणि मी काय माश्या मारत बसूं ?...अहो दुरुस्त्यांची कामं चाललीयत माझी...”

सौ. इंदिराजी नी आतां त्यांचा हुकुमी सोटा बाहेर कांढला, “ तुमच्या दुरुस्त्या ठेंवा बाजूला, आणि हें दुरुस्त करून द्या मला...ताबडतोब...!!”

आतां मी च कपाळाला हात लावला, “ अहो हें हें असलं इदरकल्याणी लचाण्ड लगेच निस्तरून द्यायला मला काय जादुगार रघुवीर समजलात की काय तुम्ही ?... ...मला करांकरां डोंकं खांजवायला लागेल, हें कसं निसतरायचं त्याचा विचार करायला...समजलं?”

सौ. इंदिराजी मख्खपणे उत्तरल्या, “ मग खांजवा की डोकं...नाहीतरी कसलेतरी निरूपयोगी उपद्व्याप चाललेले असतातच ना तुमचें घरात तिन्हित्रिकाळीं ?...काय ?”

आतां उगीच... ‘ घर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ...’ सुरूं व्हायला नको, म्हणून मी माझा सगळा गदाडा आंवरून मुकाट्यानं माझा चष्मा सौ. इंदिराजीं च्या हंवालीं केला, आणि दिवाणखान्यात त्यांचा तुटका चष्मा चहा मेजावर ठेंवून त्याला लाखोली वाहत डोंकं खांजवायला लागलो, की ' हें बेणं आतां कसं काय दुरुस्त करायचं ?’ ... ...

 

उपनेत्रांनी समोर उभं केलेलं आव्हान ' लावला गोंद आणि दिलं चिकटवून ' इतकं जुजबी अजिबात नव्हतं. चष्मा त्याची दोन्ही भिंगं जोडणा-या नाकावर बसणा-या सांकवावर -म्हणजेच ब्रिज वर – मधोंमध तुटलेला होता. तो असा चिकटवावा लागणार होता, कीं त्याची दोन्ही भिंगं समप्रतलात बसायला पाहिजेत...तींही बरोबर डोंळ्यांच्या बाहुल्या त्यांच्या मध्यबिंदूंवर येतील अश्या प्रकारें ... ...दुसरी गोष्ट अशी होती, की चष्म्याचं माप सौ. इंदिराजीं च्या चेह-याच्या मापापेक्षा किंचित कमी असल्यानं, तो लावला, की आडवा तांणला जाऊन सगळा ताण त्याच्या साकवावर आल्यामुळं तिथंच नेमका तो तुटलेला होता...सगळा नुस्ता प्लॅस्टिकचा च कारभार तो...मग दुसरं काय होणार ? तात्त्पर्य, तो जोडतांना त्या तुटलेल्या सांध्याचं कांहीतरी मजबूतीकरण करावं लागणार होतं...नाहीतर तो परत तिथंच तुटणार, हें उघडच होतं... ...

हें सगळंच एक मोठं आव्हान होतं...तें कसं काय निसतरायचं तें कांही चंटकन् मला सुचे ना... ... ...


इतक्यात समोर चहामेजावर दुपारचा वाफाळलेला चहा आणि बिस्किटांची बशी अलगद ठेंवत सौ. इंदिराजी अगदी सावकाश माझ्या शेंजारी सोफ्यावर बसल्या..., “ कसल्या एव्हढ्या गहन विचारांत पडलाय ?...चहा घ्या आधी...”

एव्हढ्या आपुलकीनं हंळुवारपणें मला कांही विचारायची सौ. इंदिराजीं ची बहुधा ती पहिली च वेंळ असावी...!!!

मी, “ हें लचाण्ड कसं काय निस्तरायचं ?...या विचारात पडलोय... ...तुम्ही असं कां करत नाही ?”

सौ. इंदिराजी, “ काय करूं म्हणताय ?”

मी, “ हे पैसे वाया गेले असं समजा...आणि नवीन च चष्मा विकत घ्या आतां उत्तम दर्जा चा... ...काय ?”

सौ. इंदिराजी फिस्कारल्या, “ म्हणजे अजून आणखी पैसे त्या मेल्या च्या डोंक्यावर मारूं मी ?... ...अजिबात नाही...!!”

मी, " मग काय करणार तुम्ही आतां ?...माझा चष्मा तर मला लागणारच ना कामं करायला ... ...”

सौ. इंदिराजीं च्या आवाजात आतां कधी नसेल इतका गोडवा उतरला, “ तुम्ही चहा घ्या बघूं आधी...गार होईल तो... ...आणि सुचेलच की कांहीतरी तुम्हांला...माझ्या मैत्रिणीनां तर केव्हढं कौतुक वाटतं तुमचं...सगळ्या म्हणतात की ' नाना अगदी कांहीही दुरुस्त करून दांखवतील ' म्हणून...कळलं ?”

मी, “ भंले तुमच्या मैत्रिणी कांहीही म्हणोत...हें लचाण्ड निस्तरणं दुरापास्त वाटतंय मला...”

मग मला तें ' दुरापास्त ' कां वाटत होतं, तें पण सौ. इंदिराजी नां समजावून बघितलं...

पण त्यांचं पालुपद आपलं तें च, “ मी कांही त्या मेल्या दुकानदाराच्या च्या बोडक्यावर अजून पैसे घालणार नाही...!!!”

मग शेंवटीं ' कांहीतरी इलाज-उपाय सुचेल तेव्हां बघूं ' अशी सौ. इंदिराजींच्या तोंडाला पानं पुसून मी त्या वेळेपुरतां कां होई ना...मोकळा झालो... ... ...

सौ. इंदिराजी मात्र मजेत माझा वापरातला चष्मा बळकावून मोकळ्या झालेल्या होत्या...!!!

 

असा एक पंधरवडाभंर उलटला असेल-नसेल...

एका सकाळीं चहा मेजावर कागद-पुस्तकं पसरून सकाळच्या पहिल्या चहाची लज्जत चांखत माझी कॅलक्युलस् बरोबर कांहीतरी झंटापट चाललेली असतांना दरवाज्याची घंटा खंणखंणली. सौ. इंदिराजी नी स्वयंपाकघरातनं आवाज दिला, “ अहो कोण आलंय तें बघा जरा...माझा हात नाष्ट्यात गुंतलाय...”

मी हातातली सौ. इंदिराजीं ची गोळीलेखणी टोंपण लावून खाली मेजावर ठेंवली, दरवाजा उघडला, दूधवाल्याकडून दुधाच्या पिशव्या घेंतल्या, त्या सौ. इंदिराजीं कडं पोंचवल्या, आणि पुन्हां माझ्या कामाकडं वळायला सोफ्यावर बैठक मारली, आणि कसं कोण जाणे...माझं लक्ष्य मेजावरच्या कागदांत लोळत पडलेल्या त्या गोळीलेखणी नं वेंधून घेतलं... ...नेहमीची च गोळीलेखणी ती... ...तिच्यातलं असं काय बरं भंरलं होतं नजरेत ?

 

जरा डोकं खांजवल्यावर मग ध्यानांत आलं तें... ...गोळीलेखणीची खिश्याला अडकवायची पोलादी अडकणी, अर्थात् ' बॉलपेन ची क्लिप् '...मग साक्षात्कार झाला, की त्या अडकणी चा आकार-उकार आणि बांक हा सौ. इंदिराजीं च्या दुरुस्त करायच्या चष्म्याच्या सांकवाच्या आकार – उकार आणि बांकाशी किती मिळता-जुळता आहे, याकडं माझं लक्ष्य नकळतच वेंधलं गेलेलं होतं... ...

मी तंडक सौ. इंदिराजीं ना हांक मारली, “ अहो...ताबडतोब इकडं या...असाल तश्या...”

सौ. इंदिराजी इडली पिठानं बरबटलेल्या हातांनीच बाहेर आल्या, “ काय झालं इतका शंख करायला ?...कश्याला हांक मारलीत मला ?...कामं पडलीयत ढीगभंर माझ्या मागं...”

मी हंसलो, “ तुमचा मोडका चष्मा कदाचित दुरुस्त होऊं शकेल...हें सांगायला...”

सौ. इंदिराजीं चा चेंहरा आतां आकर्ण उजळला, “ अय्या...खरंच सांगताय ?...की...”

मी, “ तुमच्या ' की ' पुढं कांहीही नाही... ...चष्मा दुरुस्त करायची शिकस्त करून बघतां येईल...पण एक अट आहे माझी...”

सौ. इंदिराजीं च्या भिवया आंक्रसल्या...डोंळे बारीक झाले, “ कसली काय अट म्हणालात ?”

मी हातातली त्यांची गोळीलेखणी त्यांच्या चेंह-यासमोर नाचवत उत्तरलो, “ ह्या चं आणि तुमच्या मोडक्या चष्म्याचं कांहीही बरं-वाईट झालं, तरी तुम्ही तोंडातनं चकार शब्द कांढायचा नाही...आणि जर तसं करायला गेलात, तर मी कांहीही ऐकून घेणार नाही... ...हें मान्य असेल, तरच प्रयत्न करून बघतो ...बोला...काय करायचं ?”

सौ. इंदिराजी अगदी जिवावर आल्यासारखा चेंहरा करून एकदाच्या कबूल झाल्या, आणि मी सकाळचं स्नान-गायत्री-नाष्टा वगैरे आंवरून मग त्या उद्योगाला लागलो... ...

सर्वप्रथम चष्मा कार्यशाळेतल्या मेजावर उताणा बंसवून घेतला, मग त्याचा तुटलेला सांकव चष्म्याची दोन्ही भिंगं समप्रतलात राहतील अश्या बेतानं तुटलेल्या दोन्ही पृष्ठभागांवर तात्काळ सुकणा-या गोंदाचे दोन थेंब टांकून नीट जुळवला, आणि वाळायला ठेंवला...

पांठोंपांठ सौ. इंदिराजीं च्या गोळीलेखणी चा शिरच्छेद करत त्याची पोलादी अडकणी कानशी नं कांपून कांढली...

आणि ती अडकणी जेव्हां चष्म्याच्या कच्च्या सांधलेल्या साकवाला जुळवून बघितली , तेव्हां माझ्याच नजर अंदाजावर मी बेहद्द खूष झालो...अडकणी चा आणि साकवा चा बांक अगदी तंतोतंत जुळत होता... ...!!

मग साकवाच्या आंतल्या-बाहेरच्या लांबीच्या मापांत मी अडकणीचे दोन तुकडे कांपून घेतले , जरूर तेंव्हढा तासाभंरात वाळणारा पण सुकल्यावर मजबूत पकड घेईल असा गोंद कालवून घेंतला, आणि अडकणीचा एक तुकडा साकवावर आंतल्या बाजूनं चिकटवून टांकला... ...

तेव्हढं काम झाल्यावर मग सगळा हत्यारां-अवजारां चा पसारा आधी नीट आंवरायला लागलो...तेव्हढं होईतोंवर आंतली बाजू बारा आणे सुकलेली होती.

मग अडकणी चा दुसरा तुकडा त्या च पध्दती नं मी साकवावर बाहेरच्या बाजूनं चिकटवून टांकला, आणि काम संपवून सौ. इंदिराजीं च्या कंचाट्यातनं सफाचट मोकळा झालो... ... ...!!!

कामाचा फंडशा पडल्यावर सौ. इंदिराजीं ना पुन्हां हांक मारली, तश्या त्या पळत च आल्या, “ झाला चष्मा दुरुस्त ?...बघूं बघूं...”

मी कार्यशाळेच्या मेजावर दिमाखात बसलेल्या त्यांच्या चष्म्याकडं फक्त बोंट दांखवलं , “ आठ तास उलटले, की तुम्ही पुढची पांच वर्षं तरी हें वापरायला मोकळ्या आहांत इंदिराजी... ...काय ?”

 

सौ. इंदिराजीं चा चेहरा आतां मात्र नुकत्याच खुडून पाण्याचा फंवारा मारलेल्या गेंदेदार टंवटंवीत गुलाबासारखा फुलून आला..., “ अय्या...कित्ती छान दुरुस्त झालाय हो चष्मा...अगदी मस्त च... ...आतां एक च करां अजून...”

मी कपाळाला हात लावला, “ आतां आणखी काय काय करायचं राह्यलंय तुमचं अजून ?”

सौ. इंदिराजी सूचक हंसल्या, “ कांही नाही हो फारसं... ...चष्मा सुकला ना, की सांगते...तुम्हांला...”


सायंकाळपर्यंत चष्मा अगदी खंडखंडीत सुकला ...

सौ. इंदिराजीं नी तो डोंळ्यावर चंढवून पाहिला ... ...

मग त्यांच्या ओंठांना एका कोंप-यात किंचित मुरड पडली न् म्हणाल्या ," ह्याची एक काडी सुटी करून ठेंवा, आणि बाहेर पडायची तयारी करा... ...आलेच मीही आंवरून...”

मी चिडलो, “ आतां हा पुनश्च विध्वंसक उपद्व्याप कश्यासाठी ?”

सौ. इंदिराजीं हंसल्या, “ तुम्हांला नाही कळायचं तें...सांगतेय तेंव्हढं करां फक्त...”

मी चंडफडत स्क्रू कांढून चष्म्याची एक काडी सुटी करून ठेंवली, आणि कपडे चंढवायला गेलो...

सगळी तयारी झाल्यावर सौ. इंदिराजी चष्मा आणि काडी त्यांच्या बटव्यात टांकत म्हणाल्या , “ चला...बुलेट चष्म्याच्या दुकानाकडं घ्या...”

मी, “ आतां तिथं काय अडलंय तुमचं अजून ?”

सौ. इंदिराजी , “ घ्या तर गाडी दुकानाकडं... ...कळेल सगळं आपोआप...”

मी पांच-दहा मिनिटांनी बुलेट त्या चष्म्याच्या दुकानासमोर उभी केली ,आणि आम्ही दरवाजा ढंकलून आंत शिरलो ... ...

गल्ल्यावर तें च मालक बसलेले होते , “ अरे...या...या मॅडम... ...कश्या काय आलांत ?... ...चष्मा चांगला चाललाय ना ?”

मॅडम, “ अहो चाललाय काय म्हणून काय विचारताय ?...चांगला पळायला लागलाय तो...”

दुकानदार मामा आतां चंपापले, “ काय झालं मॅडम ?”

मॅडम, “ कांही नाही हो...याची एक काडी निखळून पडलीय, तेंव्हढी बसवून द्याल काय जरा ?”

दुकानदारानं आतां श्वास टांकला, “ कां नाही...कां नाही मॅडम ?...चष्मा आणलाय ?...द्या इकडं...”

मॅडम नी शांतपणे चष्मा कांढून गल्ल्यावर ठेंवला...

दुकानदार मामा नी घाईघाईत खणातनं एक बारीक स्क्रू काढून काडी बसवली... ...

चष्मा परत द्यायच्या आधी तो फडक्यानं पुसतांना त्यांचं लक्ष्य त्याच्या साकवाकडं गेलं... ...

आणि त्यांनी आमच्या देंखत आ वांसून कपाळाला हात लावला... ...!!!”

, “ मॅडम...चष्मा मोडला होता काय हा ?”

मॅडम हंसल्या, “ बरोबर ओंळखलंत... ...दोन तुकडे झाले होते त्याचे...”

दुकानदार, “ हा कुठं रीपेर करून घेंतलात मॅडम ?”

मला दुकानदार मामांची विलक्षण कींव आली... ...

मॅडम, “ सांगते...पण मला आधी हे सांगा...की असे बरेच चष्मे विकले असतील ना तुम्ही ?”

दुकानदार मामा आतां गळफंटले , “ लय विकले जातात मॅडम... ...कां हो?”

मॅडम नी मग एका झंटक्यात दुकानदाराचं श्राध्द घातलं, “ कांही नाही हो...तीं लय चष्मे विकलेलीं गि-हाइकं हे असे मोडके चष्मे घेऊन आली ना तुमच्याकडं, की त्यांना आमच्याकडं च पांठवून द्या...म्हणजे आमचा पण धंदा जोरात चालेल !!!...काय ?”

पुढं काय झालं, तें सांगायला मी कश्याला लेखणी झिजवूं ?

तें तुकोबानी च सांगितलंय...


                               ,"तुका म्हणे ' उपनेत्र विके ' | जाले गंपगार मुके

                                चक्षुर्वैसत्यम् ' नेमके | बाधले त्यांसी ||

                         गीतेतला त्रिकालाबाधित | कृतकर्मफलसिध्दान्त

                         लावियला कपाळीं हात | दुकानदारें !!! ||

 

दुकानदार मामां चा असा ' मामा ' करून तिथनं बाहेर पडल्यावर सौ. इंदिराजी म्हणाल्या, “ वृंदी-भावजीं ची ब-याच दिवसांत भेंट झालेली नाही...आणि वेळ पण आहे निवांत...चला... बघूं या तर सापडतात काय घरीं तें... ...”

सौ. वृंदावहिनी घंरी च होत्या... ...शरबा मात्र कुठंतरी बाहेर गेलेले होते.

तिथं मग भोजनाची तयारी करतां करतां दोघीं च्या गप्पा रंगल्या...

ओंघाओंघात सौ. इंदिराजीं च्या चष्म्या चा विषय निघाला, आणि सौ. इंदिराजीं चं सगळं कथाकथन ऐकल्यावर सौ. वृंदा वहिनी म्हणाल्या, “ बरं झालं चांगली खोड तोडलीस तें सुमे...अगं हल्ली ही फंसवा फंसवीची दुकानदारी च फार बोकाळलीय बघ...पण तुला एक सांगूं ?”

सौ. इंदिराजी, “ काय तें ?”

सौ. वृंदावहिनी, “ सुमे...उद्यां इथं येऊन जर तूं आम्हांला सांगितलंस ना की ' नाना घरीं च एक अवकाशयान बांधून त्यातनं गुरू ग्रहावर जाऊन आले ' म्हणून, तर आम्हांला तें खरंच वाटेल बघ ...!!”

दोघी ह्याः ह्याः ह्याः करत हंसायला लागल्या ... ...

आणि मी च कपाळावर हात मारून घेंतला...!!!

 

*********************************************************************

-- रविशंकर.

१८ नोव्हेंबर २०२३.